ढापे चोरणारी टोळी १४ तासांत गजाआड : शिरूर पोलिसांची कारवाई
वडनेर , जांबुत ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शोधकार्यास मदत
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
पाटबंधारे विभागाकडून काढून ठेवलेले बंधाऱ्याचे ढापे चोरून नेणाऱ्या टोळीला वडनेर (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडुन गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. भंगार व्यावसायिक संजय यादव,अजयकुमार दुखी मौर्य, विरेंद्रकुमार केसरीप्रसाद, टेम्पो चालक गोरक्षनाथ अंबादास गोंडे सर्वजण रा.सिन्नर (ता.सिन्नर, जि. नाशिक) आणि पिक अप चालक प्रकाश धोंडीबा गावडे रा. थुगाव (ता आंबेगाव, जि.पुणे) अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करून टेम्पो, पिक अप आणि चोरी केलेले ६२ ढापे ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, शनिवारी ( दि १७) पहाटेच्या सुमारास वडनेर येथील नाथा शंकर निचित यांच्या घराजवळील पाटबंधारे विभागाने काढून ठेवलेले ढापे टेम्पो मध्ये भरत असताना निचित यांच्या मजुरास जाग आल्याने बाहेर येवून बॅटरी चा उजेड करताच चोरट्यांनी टेम्पो घेवून तेथून पळ काढला होता.
या घटनेची माहिती समजताच पुणे ग्रामीणचे शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी शिरूर पोलिसांना जलदगतीने कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत सहायक फौजदार मांडगे, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर,होमगार्ड आकाश येवले यांना बरोबर घेऊन पथकामार्फत पिक अप चालक प्रकाश गावडे (थूगाव, ता.आंबेगाव) यास पिकअप सह टाकळी हाजी येथून तर फरार आरोपींना सिन्नर येथून ताब्यात घेतले.
शासकीय मालमत्तेवर डल्ला मारणारी टोळी गजाआड झाल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ आणि पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.