अतिक्रमण हटविल्याने टाकळी हाजीतील आरोग्य केंद्र घेणार मोकळा श्वास
टाकळी हाजी : सत्यशोध प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते.यामध्ये बहुतांशी हॉटेल असल्याने वासामुळे रुग्णांना त्रास होत होता. आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि प्रशासन मात्र स्थनिकांचे व्यवसाय असल्याने गप्प होते. रस्त्याच्या कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावूनही अतिक्रमण न निघाल्याने शाखा अभियंता नवनाथ शेळके यांनी स्वतः तेथे येवून कारवाईचा बडगा उगारला.आणि आरोग्य केंद्रा समोरील परिसर रिकामा झाल्याने आरोग्य केंद्र मोकळा श्वास घेऊ लागले आहे .
येथील रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून गावठाण हद्द सोडून गावाबाहेरील कामास अग्रक्रम देवून ठेकेदाराने काम पूर्णत्वास आणले आहे. विजेचे खांब, सांडपाण्याची गटारी, अतिक्रमणातील बांधकामे अशा अडचणींमुळे हे काम मागे ठेवण्यात आले होते.
आरोग्य केंद्रात येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग ची व्यवस्था नसल्याने लोकांची गैरसोय होत होती. कंपाऊंड बाहेरून व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभे केल्याने आरोग्य केंद्र कुठे आहे हे शोधावे लागत होते. मात्र तूर्तास तरी पार्किंग ची अडचण भासणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कारवाई फक्त आमच्यावरच का…
गरिबांचे शेड हटविले मात्र बड्या व्यावसायिकांना अभय
प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरील अतिक्रमण हटविण्यात आल्याने तेथील व्यावसायिक संतप्त झाले आहेत. हा कारवाईचा बडगा फक्त आमच्या पुरताच का? बड्या लोकांचे अतिक्रमण काढण्यात टाळाटाळ आणि गरिबांच्या रोजीरोटीवर घाला का? रस्त्याच्या कडेने असणारी सर्व अतिक्रमणे हटणार का? असा सवाल कारवाई झालेल्या लोकांकडून विचारला जात आहे.