कांदाचाळीस आग : शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान…..
टाकळी हाजी : सत्यशोध न्युज
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील टेमकरवस्ती येथे कांदाचाळीला अज्ञात इसमाने आग लावल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत शेतकऱ्याने शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
टेमकरवस्ती येथील सुभाष संभाजी भोसले यांनी कांदाचाळीत विक्रीसाठी वखारीमध्ये साठवलेला कांदा गुरुवारी (दि १) दुपारच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या उद्देशाने पेटवून दिल्याने त्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच वखारीजवळ शेतातील कृषी साहित्य ठेवण्यासाठी बनविलेली छोटी कोपी आणि त्यातील साहित्य जळून खाक झाली आहे. बाजारभाव कमी असल्यामुळे मार्च महिन्यात काढलेला कांदा नवीन वखार करून साठवणूक केली होती. कांद्याबरोबर वखारीचेही नुकसान झाले.या वखारीच्या पत्र्यांना सुध्धा तडे गेले आहेत.मोठ्या मेहनतीने पिकविलेला कांदा डोळ्यादेखत जळताना पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.
या घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी घटनास्थळी भेट देत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलीस आणि तलाठी यांना कळवून पंचनामा करण्यात आला असून या प्रकाराची चौकशी व्हावी व शासन दरबारी या घटनेची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.