टाकळी हाजीतील टेमकर वस्तीवरील कृषी पंप व केबल चोरी करणारे गजाआड
बेट भागातील इतर चोऱ्यांच्या तपास लागणार का? नागरिकांचा सवाल
टाकळी हाजी: सत्यशोध वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी बेट भागातील कृषी पंप व केबल चोरीने शेतकरी हैराण झाले आहेत. या चोऱ्यांच्या शोध घेण्यात पोलीस मात्र उदासीन असल्याचे दिसल्याने समाज माध्यमांनी वारंवार आवाज उठवला होता. अखेर शेतकरी संघटनाही आकमक झाल्याने याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना सुचना दिल्या होत्या.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले आणि एकनाथ पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेत टाकळी हाजी येथील टेमकर वस्तीवरील कृषी पंप आणि केबल चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात यश मिळविले. गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन कृषी पंप व केबल चोर तसेच चोरीची केबल व कृषी पंप घेणारा यांना जेरबंद केले आहे.
टाकळी हाजी येथील वैभव सुरेश पाराठे ( वय २३ वर्षे ), गौरव रामचंद्र पाराठे ( वय १९ वर्षे) , सुरेश मारुती पाराठे (वय ६० वर्षे ) आणि शिरूर येथील भंगार व्यवसायीक रज्जाक दाऊद शेख (वय ५९ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडुन चालु स्थितीतील १२ कृषी पंप व केबल असा एकुण १,३८, १०० /- रु. चा माल हस्तगत करून एकुण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.
टाकळी हाजी, माळवाडी, फाकटे, आमदाबाद,वडनेर , पिंपरखेड, जांबुत,काठापूर, चांडोह, निमगाव दुडे या भागातूनही अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या साहित्याच्या अनेक चोऱ्या झाल्या असून पोलीस याबाबतही अशीच यंत्रणा राबविणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, एकनाथ पाटील, सहा. फौजदार माणिक मांडगे, पोलीस नाईक धनजंय थेऊरकर, विनोद मोरे, पो.कॉ. रघुनाथ हाळनोर, सुरेश नागलोत, विशाल पालवे, दिपक पवार, विष्णु दहीफळे , होमगार्ड आकाश येवले यांच्या पथकाने केली.
शेतक-यांनी नदीकिनारी असणा-या कृषी पंपाचे संरक्षण करण्यासाठी गट तयार करून त्या ठिकाणी रात्रीचे वेळी आळीपाळीने गस्त करावी.त्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस मदत देण्यात येईल.
…… सुरेशकुमार राऊत,पोलीस निरीक्षक शिरूर