शिरूर बेट भागातील अवैध धंद्यांना अभय कुणाचे ….
हप्तेबाहद्दर जनतेसमोर येणार का : सामान्यांचा संतप्त सवाल
टाकळी हाजी: प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील बेट भागातील सर्व गावांमध्ये अवैध धंदे सुरू असून याबाबत वर्तमान पत्र,सोशल मीडिया द्वारे आवाज उठविण्यात येवूनही धंदे मात्र जोमात सुरू आहेत , यामुळे कारवाईचा फक्त दिखाऊपणा करण्यात आला असल्याची चर्चा बेट भागात रंगू लागली आहे.
अवैध धंदे करणाऱ्यांशी लागेबांधे असलेले काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते मात्र पोलीसांच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेत असून त्यांना पाठबळ देण्याचे काम करत आहेत . या व्यवसायांना अभय नक्की कुणाचे? यांना पाठीशी का घातले जाते? माध्यमांनी इतका आवाज उठवूनही पोलीस गप्प का? . काही ठराविक लोकांवरच वारंवार कारवाईचा बडगा उगारला जातो,मात्र इतर व्यावसायिक जोमात असतानाही तिकडे दुर्लक्ष का? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात घर करून राहिले आहेत.
बेट भागातील गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी येथे पोलीस दुरक्षेत्र असतानाही शिरूरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून तसेच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाकडून काही ठिकाणी कारवाई होत आहे.मग या दुरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना हे अवैध धंदे माहीत नाही का ? यामागे नक्की कारण काय हे जनतेसमोर आले पाहिजे अशी अपेक्षा या भागातील सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
काही ठराविक लोकांमार्फत आणि टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राच्या एका कर्मचाऱ्याकडून हप्ते गोळा केले जात असल्याची जोरदार चर्चा बेट भागात रंगली आहे.