तामखरवाडी येथे शेतकऱ्यांवर कोल्हयाचा हल्ला…
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील तामखरवाडी चे शेतकरी दशरथ मारुती मुंजाळ (वय ७०) , पूजा विनोद कळकुंबे ( वय २५) , सुरेश मारुती चोरे ( वय ४०) या तीन व्यक्तींवर कोल्हयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी चार ते पाच च्या दरम्यान हल्ला झाला आहे.हा कोल्हा पिसाळलेला असावा असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पूजा कळकुंबे ही कांद्याच्या शेतात कांदे काटत असताना अचानक कोल्हयाने पूजा हिच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला, तिथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा करताच कोल्ह्याने धूम ठोकली. त्यानंतर काही वेळातच दशरथ मुंजाळ हे शेतात गवत कापत असताना त्यांच्या हाताचा चावा घेतला. त्यानंतर पुन्हा तासाभरात सुरेश चोरे यांच्या पायाला चावा घेतला. यापैकी दोघांनी टाकळी हाजी येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे उपचार करून सर्वांना पुढील उपचारासाठी शिरूर येथे पाठविण्यात आले आहे.हे सगळे हल्ले साधारणपणे एक ते दिड किलोमीटर अंतरात झाले आहेत.
घटनेची माहिती समजताच माजी सरपंच दामुशेठ घोडे, सरपंच अरूणाताई घोडे , सोसायटीचे संचालक संतोष गावडे यांनी रुग्णालयात जावून रुग्णांची भेट घेतली.
कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी विशेष टास्क फोर्स पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःची,लहान मुलांची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी.
… मनोहर म्हसेकर , वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर