गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची सतर्कता..
टाकळी हाजी
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे शिरूर – नारायणगाव रोडवर आशिर्वाद क्लिनिक समोर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. पोलिस नाईक धनंजय थेऊरकर आणि संतोष पानगे यांनी जे सी बी च्या सहाय्याने रात्रीच ते झाड बाजूला हटवून रस्ता खुला केला.
रात्रीच्या वेळी या रस्त्याने पुणे मार्केट ला जाणाऱ्या तसेच इतरही बाजारासाठी कृषी माल घेवून जाणाऱ्या मालवाहू गाड्या, या परिसरातील एम आय डी सी मध्ये काम करणारे कामगार यांची ये – जा चालू असते. ज्या ठिकाणी झाड पडले होते तिथे उतारावरून वाहने वेगाने येत होती त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती.
एक दुचाकी वरून जाणारा युवक त्या ठिकाणी थोडक्यात बचावला. हे टाकळी हाजी येथील उद्योजक संतोष पानगे यांनी पाहिल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना कल्पना दिली. गस्तीवर असलेले पोलीस नाईक धनंजय थेऊरकर यांनी सतर्कता दाखवत त्या ठिकाणी दाखल झाले. संतोष पानगे हे स्वतः त्या ठिकाणी जे सी बी घेवून आले रात्री साडेबारा वाजता त्यांनी रस्ता मोकळा केला.
रात्रीच्या वेळी दुर्घटना होवू शकते हे लक्षात येताच रस्ता खुला करून दिला याबद्दल टाकळी हाजी चे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी त्यांचे कौतुक केले.