दिवंगत माता-पित्यांचे स्वप्न केले साकार

जांबूतचा कृष्णा बनला अखेर पोलीस

0

जांबूत : प्रतिनिधी (दि.२६)

पोलीस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण तयारी करत असतात मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत तयारी करून मोजकेच यशस्वी होतात. लहानपणातच आई – वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरके झालेल्या जांबूत (ता.शिरूर) येथील कृष्णा धनसिंग सावंत याची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. चासकमान (ता.खेड) येथे कृष्णाचा जन्म झाला. तद्नंतर कृष्णाचे आजपर्यंतचे संपूर्ण बालपण जांबूत येथेचे गेले. जांबूत (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळा, जय मल्हार हायस्कूल आणि आदर्श माध्यमिक विद्यालयात आपले बारावी पर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. गोसावी समाजातील असणाऱ्या कृष्णाचे आई –वडील दुसऱ्याच्या बांधावर काम करून मोलमजुरी करायचे. सकाळी काम केल कि संध्याकाळी पोटाची सोय व्हायची अस हातावरचं पोट असलेली काहीशी परिस्थिती कृष्णाच्या कुटुंबाची होती. अशातच कृष्णाच्या बालपनातच दुर्धर आजाराने त्याच्या वडिलांचे तर पुढील एक-दोन वर्षात आईचे अपघाती निधन झाल्याने कृष्णा आणि त्याचा मोठा भाऊ दोघेही पोरके झाले. कृष्णाचा भाऊ दत्तात्रय हा वाहनचालक म्हणून परिसरात मालवाहतुकीचे काम करतो. आई वडिलांच्या पाश्चात सुमन मकवाने या आपल्या आत्याने कृष्णा व दत्तात्रय यांचा सांभाळ केला. इयत्ता दहावी पासूनच पोलीस होण्याचे ध्येय समोर ठेऊन कृष्णाने प्रयत्नांची पराकष्ठा चालू ठेवत अवघ्या वयाच्या बावीसाव्या वर्षात पहिल्याच प्रयत्नात पुणे शहर पोलीस दलात भरती होण्यासाठी त्याने आपला अर्ज दाखल केला आणि मोठ्या जिद्दीने सामोरे जात यश संपादन करून तो या भरतीत यशस्वी झाला. कृष्णाच्या यशाबद्दल विचारल्यावर त्याच्या डोळ्यातील येणारं पाणी हे त्याच्या सारख्या गरीब परिस्थितीशी संघर्ष करत खाकी वर्दीचे स्वप्न बघणाऱ्या युवकांचे प्रोत्साहन व प्रेरणास्थान नक्की बनेल. कृष्णाला पोलिस खात्यामध्ये अधिकारी बनायचं स्वप्न त्याने आतापासूनच मनात ठेवलेलं असल्याचे त्याने सांगितले. जांबूत (ता.शिरूर) येथील जीनियस करिअर अॅकॅडमीच्या माध्यमातून दिवंगत आईवडिलांचे पोलीस होण्याचे स्वप्न कृष्णाने अखेर पूर्ण केले. या यशाबद्दल जांबूत ग्रामस्थांच्या वतीने कृष्णाचे अभिनंदन करण्यात आले.

 

 पिंपरखेड (ता.शिरूर) येथील शेतकरी कुटुंबातील सचिन सोपान बोंबे याने देखील पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होऊन मोठे यश संपादन केले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर चार बहिणी व आई यांची जबाबदारी सचिनवर आली. तुटपुंजी शेती आणि दुसऱ्यांची शेती कसून रात्रंदिवस कष्ट करण्याऱ्या सचिनने या भरतीला मोठ्या धैर्याने सामोरे जात यश मिळवले आहे. शिरूरच्या बेट भागातून या झालेल्या भरतीत सुमारे १५ हून अधिक तरुण तरुणींनी यश संपादन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.