कवठे येमाई – मलठण रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
अष्टविनायक महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच
पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा
कवठे येमाई – मलठण रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील शिवाजी मारूती जाधव ( रा.पिंपरखेड ता.शिरूर ) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव होऊन त्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना अष्टविनायक मार्गावर घडली.अज्ञात वाहन घटनास्थळावरून पळून गेले आहे.
शिवाजी मारुती जाधव ( वय ६५ ) हे पिंपरखेडवरुन कवठेमार्गे शिक्रापूरला आपल्या मुलीकडे भेटायला होंडा शाईन मोटारसायकल क्रं एम.एच१४ई.टी. ६५३९ या गाडीवरून चालले होते. अष्टविनायक रस्त्यावर रावडेवाडी येथील पराग अॅग्रो साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा अपघात झाला आहे. शाईन गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. सदर ठिकाणी तीव्र उतार असल्याने कवठेच्या बाजूने येणारी वाहने दिसत नाही. तसेच सदर ठिकाणी कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता असल्याने वळण घेताना अपघात होत आहे.
घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल विशाल पालवे, दामुशेठ घोडे, राजेंद्र गावडे, डॉ . सुभाष पोकळे,दिपक रत्नपारखी, बाळासाहेब डांगे यांनी भेट दिली.
नुकतेच अष्टविनायक रस्त्याचे काम पुर्ण झाले असून वाहने भरधाव वेगाने पळत आहे. वाहन चालकांनी शिस्तीने वाहने चालवणे गरजेचे असून स्पीड बेकर बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गडदरे,सरपंच भाऊसाहेब किठे, व नागरीकांनी केली आहे.
याच अष्टविनायक रस्त्यावर भाऊसाहेब चव्हाण रा. शिरसगाव काटा यांचा दि. २२ एप्रिल रोजी टू व्हीलरवर शिंदेवाडीतील पीराचा दर्गा येथे अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या अष्टविनायक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू असून या रस्त्यावर अनेक जणांचे जीव केले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.
शिवाजी जाधव हे मूळ जऊळके ( ता.खेड ) गावचे असून त्या गावचे सरपंच पद त्यांनी भूषविले होते.पिंपरखेड ( दाभाडेमळा ) येथे गेले १५ वर्षापासून ते स्थायिक आहेत.आपल्या विवाहित दोन मुलांच्या मदतीने शेतीव्यवसात चांगली प्रगती त्यांनी करत प्रगतशील शेतकरी म्हणून चांगली ओळख निर्माण केली.त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच पिंपरखेड ( दाभाडेमळा ) काठापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.