पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
टाकळी हाजी : वृत्तसेवा
मीना शाखा कालवाच्या टेल ला असलेल्या शिरूर तालुक्यातील म्हसे गावच्या तळ्यात पाणी सुरू असताना कॅनॉलची नादुरुस्ती तसेच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पाणी तुंबले गेल्याने उलटुन शेतात घुसले.
यामध्ये म्हसे येथील शेतकरी निळू चोरे,रवी सदाफुले, विशाल ज्ञानेश्वर चोरे यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निळू चोरे यांच्या शेतातील कांद्याची काढणी सुरू असून कांदा शेतातच साठवला आहे,त्यात पाणी शिरले तसेच काढणी सुरू असलेल्या पिकातही पाणी घुसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई मिळावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रविवारी (दि.२३) सकाळी शेतात आल्यानंतर पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली,परंतु स्थळ पाहणी करण्यासाठी दुर्लक्ष केले गेले.जर लवकर लक्ष दिले असते तर नुकसान टाळता आले असते असे निळू चोरे यांनी सांगितले.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून आमच्या कष्टावर पाणी फिरल्याने आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. अशी साद शेतकऱ्यांकडून घातली जात आहे.