सचिन बोऱ्हाडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी..
सापडलेल्या साखरेच्या पिशव्या कारखाना कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द...
टाकळी हाजी
कवठे येमाई ( तालुका शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य राणीताई सचिन बोऱ्हाडे आणि सचिन बाळू बोऱ्हाडे या दाम्पत्याला ट्रकमधून पडलेल्या साखरेच्या दहा किलोच्या चार पिशव्या रस्त्यावर सापडल्या नंतर त्यांनी तात्काळ संपर्क करून त्या कारखाना कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केल्या.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कडून टाकळी हाजी येथील सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यासाठी येत असलेल्या ट्रक मधून कवठे येमाई – निमगाव दुडे या मार्गावर बोऱ्हाडे वस्ती येथे साखरेच्या दोन पिशव्या रस्त्यावर पडल्या. जवळच असलेले सचिन बाळू बोऱ्हाडे यांनी ट्रक मधून पिशव्या पडलेल्या पाहिल्यानंतर रस्त्याकडे जावून खात्री करून घेतली.त्या पिशव्यांवर भीमाशंकर कारखान्याचे नाव लिहिलेले होते.त्यांनी लगेचच त्या पिशव्या उचलल्या आणि मोटर सायकल वरून त्या ट्रक चा पाठलाग केला . परंतु पुढे काही अंतर गेल्यावर पुन्हा दोन पिशव्या पडलेल्या दिसल्या . त्यांनी त्या पिशव्या उचलल्या ,तोपर्यंत गाडी लांब निघून गेली होती.
त्यांनी लगेच त्यांचे मित्र निमगाव दुडे गावचे उपसरपंच संदीप वागदरे यांना फोनद्वारे याची माहिती दिली. वागदरे यांनी कारखाना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. जर या पिशव्या परत मिळाल्या नसत्या तर याचा भुर्दंड कारखाना कर्मचारी यांना झाला असता , आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्या ऐवजी दिवाळे निघाले असते.
त्यामुळे प्रामाणिकपणे सामाजिक बांधिलकी जपत सचिन वागदरे यांनी जे काम केले आहे , याबद्दल त्यांचे भीमाशंकर कारखाना अधिकारी आणि कर्मचारी, निमगाव दुडे गावचे उपसरपंच संदीप वागदरे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.