देशाचा अर्थसंकल्प हा विकासाभिमुख असणे गरजेचे : प्रा.शामली वाव्हळ

0

निमगांव प्रतिनिधी; दि.१२

विकासाभिमुख अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाला योग्य दिशा आणि चालना मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डी.जी. वळसे पाटील महाविद्यालयाच्या प्रा.शामली वाव्हळ यांनी केले. निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा येथे प्राचार्या डॉ.छाया जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या अर्थशास्त्र आयोजित परिसंवाद कार्यक्रम २०२३ प्रसंगी त्या बोलत होत्या.

वाढती बेरोजगारी, दारिद्र्य, महागाई, शेतकरी समस्या तसेच प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रामध्ये शाश्वत रोजगार उपलब्ध होऊन या क्षेत्रांच्या विकासाला चालना देणे हा अर्थसंकल्पाचा उद्देश ठेवल्यास त्यातूनच खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला गती प्राप्त होणार असून अर्थसंकल्प हा वरून चांगला वाटतो, परंतु जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असून हा अर्थसंकल्प महिला संवेदनशील आहे का ? कोरोना नंतर महिलांचा श्रम सहभाग कमी झालेला दिसत असून त्यावर योग्य उपाययोजना होणे गरजेचे आहे. याबाबत महिलांना आर्थिक साक्षरतेची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तर अर्थसंकल्प हा धनाढ्यांऐवजी सर्वसामन्यांच्या हिताचा असावा. त्यातून वाढत्या तरुणाईला रोजगाराभिमुख दिशा मिळणे गरजेचे असून जसा देशाचा, राज्याचा अर्थसंकल्प असतो, तसे विद्यार्थ्यांनी देखील आपल्या कुटुंबाचे अंदाजपत्रक बनवावे त्यातून आपल्या कुटुंबाचे वार्षिक जमाखर्चाचा ताळेबंद आपल्याला मांडता येईल का याची चाचपणी करणे गरजेचे आहे असे मत प्रा.राहुल डोळस यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे, ज्योती गायकवाड, सुभाष घोडे, नीलम गायकवाड, नंदा आहेर, आशिष गाडगे, प्रियांका डुकरे यांचेसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.दत्तात्रय चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल पडवळ यांनी केले; तर प्रा.शितल कांबळे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.