बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात
निमगाव सावा; प्रतिनिधी (दि.१२)
गेली अनेक दिवसांपासून शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या हि जीवघेणी ठरत आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले असून शनिवार (दि.११) रोजी रात्रीच्या सुमारास सुलतानपूर (ता.जुन्नर) येथील आतकरी मळ्यात एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. यावेळी स्थानिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली; मात्र वाढत्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात येत असल्याचे दिसून येते. या वस्तीनजीकच असलेली दाट झाडी आणि मोठ्या प्रमाणात असणारे उसाचे क्षेत्र यामुळे बिबट्याला लपण वाढलेली असून अन्न पाण्याच्या शोधात त्याचा मुक्त संचार वाढला आहे.
मागील सहा महिन्यांच्या काळात शिरूर तालुक्यातील जांबूत आणि पिंपरखेड परिसरात झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून दिवसादेखील शेतात काम करताना शेतमजूर, शेतकरी यांना बिबट्याचे दर्शन होताना दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वनविभागाच्या माध्यमातून तातडीने या भागात पिंजरे लावण्याची मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील कावळ पिंपरी, पारगाव तर्फे आळे, औरंगपुर, निमगाव सावा, साकोरी, शिरोली, सुलतानपूर हा भाग बहुतांशी बागायती स्वरूपाचा असल्याने उसाचे क्षेत्र मोठे असून अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. मागील काही महिन्यात मनुष्य वस्तीत येऊन अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून ठार केले तर मोठ्या प्रमाणात पशुधन जखमी झालेले आहे.
बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी देताना जीव मुठीत धरून जावे लागत असल्याने शेतीचे सिंचनासाठी दिवसा वीज देण्याची मागणी बिबट्या प्रवण क्षेत्रातील तालुक्यांतून जोर धरू लागली असून माजी सभापती देवदत्त निकम यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना निवेदन सादर केले आहे. तर वनविभागाकडून महावितरणला प्रस्ताव देण्यात आले . त्यामुळे वाढत्या बिबट संख्येचा व हल्ल्यांचा गांभीर्याने विचार करून आम्हास दिवसा वीज देण्यात यावी आणि वनविभागाने पाहणी करत तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.