मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार…
टाकळी हाजी : वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील बेट भागातील बिबट्यांचे हल्ले वाढले असून मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कासाबाई ठकाजी शिंदे (रा. शिंदेवाडी,मलठण) या थोरातवाडी भागात मेंढ्याचा कळप चारून सायंकाळी तळावर घेवून जात असताना अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांच्या समोर मेंढ्यावर हल्ला करून ओढत नेल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्यांचा मुलगा सतीश हा गावात गेला होता, तो आल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने शोध घेतला असता त्यास अर्धवट खाल्लेला मेंढा आढळून आला. अजूनही तीन मेंढ्या त्यांना सापडल्या नसून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.
वनविभागाच्या कर्मचारी,अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळविली असून याबाबत सकाळी येवुन पंचनामा करू असे सांगण्यात आल्याचे सतीश शिंदे यांनी सांगितले.
या भागात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवस रात्र बिबट्या संचार सुरू आहे त्यामुळे अनेकदा स्थानिकांना अचानक दर्शन होत आहे.हल्ले वाढल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली असून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पावले उचलण्याची गरज असून योग्य उपाययोजना न केल्यास एक दोन वर्षातच पशुधना बरोबरच मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.