पिंपरखेड येथे एक मादी बिबट जेरबंद …मात्र नागरिकांमध्ये भीती कायम
मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता....
पिंपरखेड : वृत्तसेवा
पिंपरखेड (ता.शिरूर ) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा ते सात वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे.एक बिबट जेरबंद झाला असला तरी परिसरातील बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे टाकले आहे.
बुधवार ( दि.१ ) रोजी रात्री पुजा जालिंदर जाधव ( वय २२ ) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला.या घटनेनंतर पिंपरखेड येथील बोंबे – कुऱ्हाडे वस्तीच्या परिसरात वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहे.घटना घडलेल्या ठिकाणापासून साडे तीनशेफुटावर विकास साहेबराव बोंबे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात रविवारी ( दि.५ ) पहाटे चार वाजता एक बिबट्या अडकला. पिंजऱ्यात अडकलेला मादी बिबट शांत वाटत असल्याने कैद झालेला बिबट हा नरभक्षक वाटत नसल्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहे. या परिसरातील नागरिक प्रंचड दहशतीखाली आहेत.पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली असल्याचे वनविभागाचे वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते यांनी सांगितले.
घटनास्थळी लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या बाजूला स्वंयचलित कॅमेरा ट्रॅपमध्ये ही मादी कैद झाली होती.तेथील हालचालीचे निरिक्षण पहाता हा हल्ला करणारा बिबट्या आहे. पकडलेल्या बिबट्याचे ठसे आणि हल्ला करणाऱ्या बिबट्याचे ठसे वनविभागाचे संबंधित तज्ञ,वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी केल्यानंतर तो नरभक्षक आहे का ते निश्चित होईल.असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता
पिंपरखेड परिसरात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवस रात्र बिबट्या संचार सुर आहे त्यामुळे अनेकदा अचानक दर्शन होत आहे.हल्ल्याची घटना घडल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली असून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पावले उचलण्याची गरज असून योग्य उपाययोजना न केल्यास एक दोन वर्षातच मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.