टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील घरफोडी,कृषी पंप चोरी , केबल चोरी तसेच कृषीची दुकाने फुटलेली असून या गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच आता टेमकर वस्ती येथील शेतकऱ्याच्या वखारीतून कांद्याची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.
टेमकर वस्तीतील म्हसेफाटा येथे चारीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरेश लोखंडे यांच्या वखारीतून रात्रीचे चोरट्यांनी कांदे चोरून नेले आहेत. यापूर्वी शेतातून कांदे काढून नेणे,भरलेल्या पिशव्या उचलून नेणे, डाळिंबाच्या बागेतून डाळिंब तोडून नेणे असे प्रकार घडलेले आहेत परंतु वखारीतून मोकळे कांदे भरून नेल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
आधीच अवकाळी पाऊस, पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाचे बाजार भाव, बिबट्यांची दहशत या समस्यांनी हैराण झालेला शेतकरी जय किसान चा नारा देत उभारी घेत असतानाच त्यांच्या कष्टावरच डल्ला मारला जात असल्याने हताश झाल्याचे दिसून येत आहे.
बेट भागातील घरफोडी,कृषी पंप चोरी, केबल चोरी ,शेतमाल चोरी अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून या चोरांना आळा कधी बसणार? जोपर्यंत यातील गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे सत्र असेच सुरू राहणार का? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.