काठापूर येथे यात्रौत्सवानिमित्त शर्यतीत धावले ३०० बैलगाडे…
पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा
काठापूर खुर्द (ता.शिरूर) येथे जय हनुमान यात्रौत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तीनशे बैलगाडे धावले.शर्यतीत सहभागी होऊन नंबरमध्ये,अंतिम शर्यतीत आलेल्या बैलगाडा मालकांना दोन मोटारसायकल तसेच अडीच लाख रुपये बक्षिस रक्कमचे वाटप करण्यात आले.
दरम्यान घाटाचे उद्घाटन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुदाम दाते, उद्योजक सागर दांगट, उपसरपंच राजाराम दाते,यशवंत दिघे, कोंडीभाऊ पवार, तात्याभाऊ दाते यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी पार पडलेल्या शर्यतीमध्ये पांडुरंग काळे (गव्हाणवाडी), बाबाजी जाधव (जाधववाडी) हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर स्व.पाटीलबुवा दाभाडे (पिंपरखेड), स्व.शंकर कुरकुटे आणि तुकाराम पोंदे यांनी द्वितीय, रोशनकुमार करंडे व टायगर ग्रुप बैलगाडा संघ लोणी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.यावेळी घाटाचा राजा म्हणून तुकाईदेवी मित्रमंडळ पारगाव व कचर पानमंद (चांडोह) यांना बहुमान मिळाला.
या यात्रौत्सावासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, अरूणा घोडे, माजी सरपंच दामू घोडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद ढोमे, अभिनेते हेमंत ढोमे, उद्योजक खुशाल बोंबे आदींनी भेटी दिल्या.माजी खासदार आढळराव यांनी भेट देऊन काठापूर खुर्द येथील मुक्ताईदेवी मंदिर व हनुमान मंदिर यासाठी प्रत्येकी १० लक्ष रूपये निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
काठापुर बैलगाडा शर्यती दरम्यान शुभेच्छा देताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील
प्रसंगी उद्योजक रवी दिघे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक दाते, दादाभाऊ दाते, कैलास कानसकर , दौलत दाते, विठ्ठल दाते, रुपेश दिघे यांचे शुभहस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले.यावेळी अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रपट कलाकार,निर्माता, दिग्दर्शकांनी लुटला आनंद
पिंपरखेडचे सुपुत्र चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्मिता अभिनेता हेमंत ढोमे, अभिनेत्री क्षिती ढोमे-जोग,आनंदी गोपाळचे दिग्दर्शक समिर विध्वंस,झिम्मा चे सहनिर्माते अजिंक्य ढमाळ,चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नी नेहा मांडलेकर यांनी उपस्थित राहून बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला.