दिव्या कवडे शासकीय चित्रकला परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत
पारनेर तालुक्यातील साईनाथ हायस्कूलची विद्यार्थिनी
- पारनेर : वृत्तसेवा
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील श्री साईनाथ हायस्कूलची दिव्या संतोष कवडे या विद्यार्थ्यांनीने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत ६९ वा क्रमांक मिळवला आहे.एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेत सुद्धा दिव्याने राज्य गुणवत्ता यादीत ५९ वा क्रमांक मिळवला होता.या दोन्ही परीक्षांमध्ये राज्य गुणवत्ता यादीत येण्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
चालू वर्षी अहमदनगर जिल्ह्यात इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत फक्त एकमेव दिव्या कवडे हिची राज्य गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून ३ लाख ५० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यातून निवड झालेल्या राज्य गुणवत्ता यादीतील १०० विद्यार्थ्यांमध्ये दिव्याची निवड झाली.निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून गुणवत्ता पारितोषिक दिले जातात. तसेच दिव्या हिने स्कॉलरशिप परीक्षेत सुद्धा गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. बालपणापासून अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये तिने प्राविण्य मिळवले आहे.दिव्या ही निवृत्त कलाशिक्षक रामदास कवडे यांची नात ,तर कलाशिक्षक संतोष कवडे यांची मुलगी आहे तसेच चित्रकला चित्रकार कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांची पुतणी आहे. तिला घरातूनच चित्रकलेचे बाळकडू मिळाले आहे.
तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य शंकरराव माने,जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे ,सरपंच कोमल भंडारी,मा.सरपंच बाबाजी भंडारी,चेअरमन बाळासाहेब पुंडे,प्राचार्य मंगेश जाधव तसेच शिक्षक व पालक यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले आहे.