पिंपरखेड येथे ठिबक संच ची चोरी

0

 

 

पिंपरखेड : प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे शेताच्या बांधावर गुंडाळून ठेवलेले जैन कंपनी चे तीन एकरचे ठिबक संच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार (दि.२५ ) रात्री घडली.ठिबक संच चोरीच्या या घटनेने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पोलिसांनी या चोरांचा शोध घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पिंपरखेड येथील पोखरकरवाडी जवळ नानाभाऊ बाळासाहेब गावशेते यांनी शेताच्या बांधावर जैन कंपनीचे तीन एकर शेतीच्या ठिबक सिंचनच्या नळ्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या.बुधवार ( दि.२५ ) रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी गुंडाळून ठेवलेले सर्व बंडल चार चाकी वाहनाचा वापर करून चोरून नेले.गुरुवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपल्यावर गावशेते शेतात गेले असता ठिबक सिंचनचे बंडल गायब झाल्याचे समजले. या संदर्भात शेतकरी नानाभाऊ बाळासाहेब गावशेते यांनी टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्र येथे तक्रार दिली आहे.

पिंपरखेड परिसरात चोरट्यांकडून शेतकऱ्यांच्या मोटारी, स्टार्टर, मोटारीच्या केबल चोरीच्या घटना या वरचेवर घडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक वेळा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.चोरट्यांनी आता शेतातील ठिबकसंचा कडे मोर्चा वळवल्याने शेतकरी धास्तावले आहेत. एक एकर ठिबक सिंचन करण्यासाठी ६० हजार रुपये खर्च होतात.सध्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी सुरू असून ठिबक संच शेताच्या बांधावरच ठेवलेले असतात. मात्र आता चोराट्याकडून ठिबक सिंचन चोरी होत असल्याने शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले ठिबक संच सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागणार आहेत.

शेतकऱ्यांच्या चोरीकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे…पिंपरखेड परिसरात अज्ञात चोरट्यांनी यापूर्वी मोटर,स्टार्टर, केबल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.मात्र या घटना वारंवार घडूनही या चोरांच्या मुसक्या आवळण्यात  पोलिसांना यश आलेले नसून आता ठिबक संच चोरी होऊन शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने पोलिसांकडून शेतकऱ्यांच्या चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.