पिंपरखेड : प्रतिनिधी:(दि. २०)
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (पंचतळे) येथे संतोष कारभारी जाधव यांच्या घरावर मध्यरात्री तीनच्या सुमारास जबरी चोरी करत सुमारे आठ तोळे सोने, मोबाईल, टायटन कंपनीचे घड्याळ व पंधरा हजार रूपये रोख रक्कम असा अंदाजे एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत रेश्मा संतोष जाधव यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पो.हवालदार अमोल आगलावे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पिंपरखेड (ता.शिरूर) हद्दीतील पंचतळे नजीक रेश्मा संतोष जाधव ह्या आपले सासू, सासरे, पती व मुलासह वास्तव्यास आहेत. आदल्या दिवशी ( दि.१९ ) रोजी रेश्मा यांची सासू व सासरे हे दशक्रियेनिमित्त बाहेरगावी गेले असताना शुक्रवार (दि.२०) रोजी पहाटे तीनच्या सुमारास अंगात निळसर जर्किंग, जीन्स पॅन्ट, काळ्या रंगाचे स्पोर्ट्सचे शूज, तोंडाला व डोक्याला मफलर असा पेहराव असणाऱ्या चार अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी तुमच्याकडे असलेले सर्व पैसे द्या, कपाटाच्या चाव्या कुठे आहेत, अशा प्रकारे धमकी देत हातातील विळ्यासारख्या दिसणाऱ्या हत्याराचा धाक दाखवत अंगावरील सर्व दागिने काढून देण्यास सांगितले. दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतील रेश्मा यांनी आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून दिले. तसेच चोरट्यांनी आपल्या हातातील कटावणीच्या साह्याने कपाटाचे लॉकर तोडून इतर काही दागिने जबरीने काढून घेतले. यामध्ये गळ्यातील व कानातील गळसर, सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र, कानातील रिंग या स्वरूपाचे सोन्याचे दागिने, मोबाईल, टायटन कंपनीचे घड्याळ, घरामागील गोठ्यात बांधलेली काळ्या रंगाची शेळी व पंधरा हजार रूपये रक्कम असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या लोखंडाची पेटीसह इतर साहित्याची उचकापाचक करून घराजवळील शेतात पेटीतील साहित्य फेकून दिले. तसेच घराला बाहेरून कडी लावून जाधव कुटुंबियांना घरामध्ये कोंडून घेत मोबाईल चोरून नेल्याने शेजारी इतरत्र कोणाशीही संपर्क करता आला नाही.
दरम्यान घटनास्थळाला शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पो.हवालदार जनार्दन शेळके यांनी भेट दिली आहे. तसेच या घटनेतील जबरी चोरी करणाऱ्या इसमांची ओळख पटण्यासाठी बोटांचे ठसे निर्देशित करणारे पथक पाचारण करण्यात येणार असून नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास शिरूरचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करत आहेत.
या भागात दरवर्षी अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता बेल्हा-जेजुरी राज्यमार्गावरील पंचतळे हे मध्यावधी ठिकाण असून अनेक रस्ते एकत्र येत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड होत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामसुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून गस्त घालणे गरजेचे असून पंचतळे ठिकाणी पोलीस चौकी व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.