ग्राहकांनो सावधान ! केव्हाही रिकामे होवू शकते आपले बँक खाते
पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१७)
अनेकदा आपणांस एसएमएस आणि बनावट (फ्रॉड) फोन कॉलच्या माध्यमातून खोटे संदेश, विविध लिंक आणि फोन येत असतात. या फोनला जर प्रत्युत्तर करून आपले के वाय सी बद्दल माहिती पुरविली आणि ओ टी पी सांगितला तर आपले बँक खाते क्षणार्धात खाली होऊ शकते. अशा अनेक घटना या आधीच्या काळातही घडल्याचे दिसून आले आहे .
अशाच प्रकारे चक्क रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काही ग्राहकांना महाराष्ट्र बँक मधून बोलतोय अशा प्रकारचे कॉल आले असून विविध प्रश्नांच्या बाबतीत विचारणा करत माहिती मागवण्यात येत होती. यामध्ये समोरील व्यक्ती हिंदी भाषेतून बोलत मी महाराष्ट्र बँकेतून बोलतोय, आपल्या खात्याची केवायसी करण्यासाठी आम्हास आपले आधार क्रमांक, पॅन क्रमांक याबद्दल माहिती हवी आहे. तसेच आपल्या खात्यास आधार लिंक नाही. आपला मोबाईल नंबर खात्यास दिसत नाही. आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी पासवर्ड आम्हास सांगावा अशा प्रकारे बनावट फोन आल्याने अनेक ग्राहकांचा गोंधळ उडाला.
अशा प्रकारे फोन आल्याने अनेकजणांना हे फोन संशयास्पद वाटल्याने त्यांनी सावधानता बाळगली. पण ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना संबंधित कॉल, लिंक, मेसेजेस खोटे अथवा बनावट आहे हे कळेलच असे नाही. तसेच या बाबतीत विचारणा करण्यासाठी बँक केव्हाही आपल्या ग्राहकांना संपर्क करत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या बनावट कॉल ला कोणताही प्रतिसाद न देता थेट आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन संपर्क साधणे गरजेचे आहे.
अशा संपर्कांना कोणताही प्रतिसाद देऊ नये व खात्यासंबंधी गोपनीय बाबी फोन वर कोणास सांगू नये. अशा प्रकारचे संदेश देत बँक आपणास वारंवार सूचित करत असतात. यामुळे ग्राहकांनी सतर्कता बाळगून आपल्या बँक खात्याची काळजी घ्यावी आणि आपल्या नजीकच्या बँक शाखेस जाऊन भेट देत समक्ष माहिती घ्यावी. अन्यथा आपले बँक खाते रिकामे होऊन मोठे नुकसान होऊ शकते.