पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१२)
जांबुत (ता.शिरूर) गावचे हद्दीत रात्रीच्या सुमारास धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात चारचाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे.
यामध्ये सदर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून बुधवार ( दि.११) रोजी रात्री पावणे आकरा वाजेच्या सुमारास हि घटना घडली. गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्याने कोणतीही हानी झाली नाही, मात्र चालकाच्या हाताला दुखापत झाली असून सदर चारचाकी वाहन हे चोंभूत (ता.पारनेर) मार्गे जांबूतकडे येत असताना हा अपघात झाला आहे. यावेळी जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, संतोष जोरी, शांताराम जोरी, अजय जोरी, संजय जोरी आदींनी घटनास्थळी धाव घेत चालकासह वाहन बाहेर काढण्यास सहकार्य केले.
संबंधित घटनास्थळावर या आधी देखील मागील दोन महिन्यापूर्वी तवेरा आणि वेगनार कारचा देखील अशाच प्रकारे अपघात झाला होता. आत्तापर्यंत सुमारे पाच ते सहा दुचाकी अपघातात अनेकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना देखील घडल्या असल्याचे यावेळी स्थानिकांनी सांगितले.
नुकतेच या रस्त्याचे डांबरीकरण झाले असून या ठिकाणी असणाऱ्या धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने वारंवार अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणी योग्य सूचनाफलक लावावेत तसेच विशिष्ट अंतरावर गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.