आमदाबाद येथे भर दिवसा शेतात बिबट्याचा तरुणांवर हल्ला…
साहसी प्रतिकार केल्यामुळे वाचले प्राण
टाकळी हाजी : वृत्तसेवा
आमदाबाद (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता शेतात काम करणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणांनी धाडस दाखवत बिबट्याशी संघर्ष करून स्वतःचा जीव वाचवला. या हल्ल्यातील दोन्ही तरुण जखमी झाले असून त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विकास रतन जाधव, वैभव मोहन जाधव अशी या तरुणांची नावे असून त्यांच्या पाठीला, हाताला, कानाला बिबट्याने हल्ला केल्यामुळे जखमा झाल्या आहेत. दरम्यान भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे आमदाबाद, माशेरेमाळा व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात पिंजरा लावून हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील शेतामध्ये हे तरुण मंगळवारी काम करत होते. यावेळी मक्याचे शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक विकास जाधव याच्यावर हल्ला केला. हा हल्ला होत असताना वैभव जाधव यांनी त्याच्या हातात असणाऱ्या काठीने विकासवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला मारले. आपल्यावर हल्ला करतोय हे पाहताच बिबट्याने विकासला सोडून वैभव जाधव यांच्या पाठीवर हल्ला करून त्याला आपल्या पंजात पकडले आणि चावा घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याने वैभव याला जोरात हिसका दिला. याच वेळेस जखमी झालेल्या विकासने बिबट्यावर हल्ला चढवला. यामुळे बिबट्या गांगरून गेला आणि वैभवला सोडून मक्याच्या शेतात पळ काढला. जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
आमदाबाद परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. या भागात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या अगोदरही पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला मालकासमोरून बिबट्या घेऊन गेल्याची घटना झाली आहे. वन विभागाने या भागामध्ये पिंजरा आणून ठेवला आहे. त्याला एक महिना होत आला आहे. परंतु अद्याप हा पिंजरा लावला नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत वन विभागाचा भोंगळ कारभार समोर आणला आहे.
तरुणांच्या इच्छाशक्तीपुढे बिबट्याची शरणागती …
या दोन्ही तरुणांच्या धाडसीपणा व एकमेकांना वाचवण्याची इच्छाशक्ती यामुळे तरुणांचे प्राण वाचले. यामुळे या परिसरात या तरुणांच्या धाडसीपणाचे कौतुक होत आहे.