फाकटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार …

वनविभागाला नक्की जाग येणार कधी?

0

टाकळी हाजी : वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील फाकटे येथे शनिवारी (दि. ७) फाकटे- टाकळी हाजी रस्त्यावरील थोरात वस्तीवर चंद्रकांत थोरात यांच्या शेळीवर आणि संजय निचित यांच्या गायीवर दुपारी २ च्या सुमारास झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व गाय जागीच ठार झाली.

थोरात यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर साहिल थोरात शेळ्या चारीत असताना त्याच्यापासून अवघ्या दहा फुटावरून बिबट्याने शेळीवर हल्ला करून जवळच असलेल्या उसाच्या शेतात शेळीला ओढून नेले. हे पाहिल्यानंतर साहिलने आरडाओरडा केला आणि घराकडे धावत गेला. त्याच्या आवाजाने लोक गोळा झाले. त्यावेळी त्यांनी तिथे संजय निचित यांची गाभण असलेली गाय पडलेली पाहिली. एकाच वेळी दोन ठिकाणी हल्ला झाल्यामुळे हे दोन्ही हल्ले दोन बिबट्यांनी केले असल्याची शंका स्थानिकांनी उपस्थित केली.

भर दिवसा बिबट्याचा पशुधनावर हल्ला झाल्याने शेतक-यांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील कामांना वेग आला असून बिबट्याचे दिवसा दर्शन होत असल्याने मजूरीवर जाणारे मजूर ही घाबरले आहेत. वनविभाग फक्त पंचनामा करत असुन या भागात तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिंपरखेड ,जांबुत, फाकटे, वडनेर ,माळवाडी, टाकळी हाजी या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून पशुधनावरील हल्ले नित्याचेच झाले आहेत. शेतकऱ्यांवर सुध्धा अनेकदा बिबट्यांचे हल्ले झालेले आहेत. पशुधना बरोबरच मनुष्यहानी झाल्याने बिबट्याची प्रचंड दहशत नागरिकांमध्ये पसरलेली आहे.हे हल्ले नक्की कधी थांबणार , वनविभाग आमचे पशुधन संपुष्टात येण्याची वाट पाहत आहे का, याबाबतीत ठोस भूमिका का घेतली जात नाही , अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.