टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचे हल्ले वाढत असून माळवाडी येथे दुपारच्या सुमारास बिबट्याने गौतम भाकरे यांच्या शेतात चरण्यासाठी बांधलेल्या वासराला तिथे काम करत असलेल्या महीलांसमोरच ओढून नेले.जवळच असलेल्या डाळिंबाच्या बागेतून पलीकडे ऊसात वासराला ओढत नेल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शी महिलांनी आरडा ओरडा केला. परंतु बिबट्याने वासराला ओढत नेवून पळ काढला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्या नंतर त्यांनी घटना स्थळी भेट दिली ,मात्र लगेच तिकडे ऊसात शोधाशोध करणे उचित होणार नाही म्हणून सकाळी शोध घेतला जाईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले.
जांबुत येथे नुकतेच नरभक्षक बिबट्याने हल्ला करून तरुणीला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर जांबुत तेथे १३ पिंजरे लावण्यात आले आहेत. माळवाडी हे गाव जांबुत पासून फक्त ९ किलोमीटर अंतरावर असल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माळवाडी परिसरात बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून या भागात तातडीने पिंजरे लावण्यात यावे. तसेच पकडलेले बिबटे हे जवळपास सोडू नये. वनविभागास जशी बिबट्यांची काळजी आहे तशी माणसांची नाही का? असा संतप्त सवाल माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे यांनी उपस्थित केला आहे.