पोखरकरवाडी येथे चंपाषष्ठी उत्साहात

पिंपरखेड येथे खंडेरायाची यात्रा व धार्मिक कार्यक्रम

0

 

पिंपरखेड : प्रतिनिधी ( दि.२९)

पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्री. खंडोबा मंदीर पोखरकरवाडी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराया यात्रा उत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविक भक्तांनी भंडाऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष केला. 

सालाबाद प्रमाणे पोखरकरवाडी येथील खंडोबा मंदिर येथे गुरुवार ( दि.२४ ) रोजी घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात करण्यात आली.चंपाषष्ठी निमित्त खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

दि.२९ रोजी गावातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात पिंपरखेड गावातून कुलस्वामी खंडेरायाची काठी व मांडवडहाळे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या.भाविक भक्तांनी भंडाऱ्याची उधळण येळकोट येळकोट जय मल्हार करत कुलस्वामी खंडेरायाचा जयघोष करत काठी मिरवणूकीत उत्साहाने सहभाग घेतला.

शाहीर शिवाजी दत्तू पवार आणि पार्टी यांचा कुलस्वामी खंडेरायाचा जागरणाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर पोपट महाराज फरकाडे (संभाजीनगर ) यांचे सुश्राव्य किर्तन व भजनाचा कार्यक्रम झाला.आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. परिसरातील भाविक भक्तांनी खंडोबा देवाचा तळी भंडार करत कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेतले.दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यावर्षी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घेतला.दिवसभरच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला होता.

पोखरकरवाडी येथील खंडेराया यात्रा उत्सव मंडळाकडून योग्य नियोजन व व्यवस्थापन करत चंपाषष्ठी कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.