पावसात महावितरण कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी
पावसात महावितरण कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी
टाकळी हाजी
शिरूर वरून टाकळी हाजी कडे येणाऱ्या ३३ के व्ही लाईनवर आमदाबाद येथे सोमवारी (दिनांक १७) वीज पडल्यामुळे टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे ,रोहिलेवाडी येथील वीजपुरवठा तब्बल २२ तास बंद होता. तो सुरू झाल्यानंतर दोन तासातच पुन्हा मंगळवारी (दिनांक १८) त्याच लाईनवर पुन्हा आमदाबाद परिसरातच वीज पडल्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा भर पावसात शिवाय रात्रीच्या वेळी काम करत महवितरण टाकळी हाजी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत सुरू केला.
टाकळी हाजी येथील महावितरणचे कर्मचारी यांनी सोमवारी लाईन चेक केल्यानंतर ज्या ठिकाणी लाईनवर विज पडली होती तेथे बऱ्याच ठिकाणी इन्सुलटर फुटलेले निदर्शनास आल्यानंतर भर पावसात कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते. अखेर तब्बल २२ तासानंतर काम पूर्ण होवून वीजपुरवठा सुरळीत झाला.मात्र दोन तासातच पुन्हा वीज पडल्याने खंडित झालेला वीजपुरवठा रात्रीच्या वेळी पाऊस पडत असताना सुद्धा या कर्मचाऱ्यांनी ७ तास काम करून सुरू केला.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने , सहाय्यक अभियंता विजय होळकर,राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी हाजी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी यासाठी कष्ट घेतले. या सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
मात्र या काळात वीज नसेल तर अनेक समस्या उपस्थित होतात याची जाणीव सर्वच नागरिकांना झाली.