धरणातून अचानक सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान….
बंधाऱ्याचे ढापे न काढल्यामुळे शेतात घुसले पाणी
टाकळी हाजी (दिनांक२१)
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील कुकडी नदीवरील कुंड येथील बंधाऱ्याचे ढापे टाकलेले असल्यामुळे अचानक वाढलेल्या पाण्याला अडथळा तयार झाल्याने मार्ग बदलून शेतात पाणी घुसले. येडगाव धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यामुळे धरणातून कुकडी नदीला २५ हजार क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच या बंधाऱ्यावरील ढापे टाकण्यात आले होते . शुक्रवारी सकाळीच पाटबंधारे विभागाकडून येडगाव धरणातून २५ हजार क्युसेक्स ने पाणी सोडण्यात येणार आहे , त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितता पाळावी असा संदेश पाटबंधारे विभागाकडून दिला गेला . परंतु या बंधाऱ्याचे टाकलेले ढापे न काढल्यामुळे पाणी नदीकाठच्या शेतात घुसले.
कुंड येथे नदीकाठी ऊसतोड करणारी टोळी वास्तव्यास होती , त्यांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले असून त्यांनाही तेथे राहणे असुरक्षित वाटत आहे. या नुकसानीला नक्की जबाबदार कोण? धरणातून पाणी सुटणार म्हणून ढापे काढले असते तर नदी प्रवाहातून पाणी सरळ गेले असते , आता शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई तरी मिळेल का? असा संतप्त सवाल येथील शेतकरी बापू होणे , सुनील थोरात यांनी उपस्थित केला आहे.