विकास कुंभार यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदोन्नती

0

शिरूर : (बापू जाधव) | कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा व सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पोलीस खात्यात आपला वेगळा ठसा उमटविणारे विकास दत्तात्रय कुंभार यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदोन्नती मिळाली आहे. सध्या ते शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, त्यांच्या पदोन्नतीमुळे पोलीस दलासह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

विकास कुंभार यांनी दि. २३ मे १९९५ रोजी पुणे ग्रामीण पोलीस दलात सेवेत प्रवेश केला. १९९९ साली शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर २००९ ते २०१५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाण्यात, तर २०१५ ते २०२१ दरम्यान लोणीकंद पोलीस ठाण्यात त्यांनी प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी बजावली. २०२१ पासून ते पुन्हा शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

सेवेच्या प्रदीर्घ काळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था, गुन्हेशोध पथक, गोपनीय शाखा तसेच क्राईम विभाग आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पार पाडल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील, तत्कालीन पालकमंत्री अजित पवार, तसेच पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील, संदीप पाटील व अभिनव देशमुख यांच्या हस्ते त्यांना विविध सन्मान व पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या हस्ते त्यांनी अधिकृतपणे PSI पदोन्नती स्वीकारली. कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे, जनतेशी सुसंवाद राखणारे व गुन्हेगारीविरोधात ठोस कारवाई करणारे अधिकारी म्हणून विकास कुंभार यांची ओळख आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पोलीस अधिकारी, सहकारी, मित्रपरिवार व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, PSI म्हणूनही ते अधिक प्रभावी कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.