अण्णा, निवडणूक आम्ही हातात घेतली !…बेट भागातील सामान्य माणसाचा निर्धार

दामू अण्णांना झेडपीपर्यंत नेण्याचा संकल्प

0

शिरूर | होतील की नाही ? म्हणता म्हणता अखेर जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावागावात नवचैतन्य संचारले आहे. गावगाड्याच्या सत्तेची सूत्रे हातात घेण्यासाठी झेडपीची पायरी चढणे हे प्रत्येक नेतृत्वाचे स्वप्न असते, आणि याच स्वप्नाची दीर्घकाळ वाट पाहणारा बेट भाग आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. बेट भागासह संपूर्ण शिरूर तालुका, आंबेगाव व जुन्नर परिसर ज्या नेतृत्वाच्या प्रेमात पडला आहे, ते नाव म्हणजे — टाकळी हाजीचे भाग्यविधाते दामू अण्णा घोडे.

आजचा काळ हा पैशांच्या ताकदीवर सत्ता हस्तगत करण्याचा झाला असताना, पैशाच्या जोरावर सामान्य माणसाला गृहीत धरणाऱ्या धनदांडग्यांना विचारात पाडणारे नेतृत्व म्हणजे दामू अण्णा. फाटक्या खिशाचा हा फकीर माणूस हजारो हृदयांवर राज्य करतो, हेच आजच्या राजकारणातील न उलगडणारे कोडे आहे.
मागील अनेक वर्षांपासून बेट भागातील सामान्य माणूस मनात एकच स्वप्न बाळगून आहे —
“कशालाही सामोरे जाऊ, पण दामू अण्णांना झेडपी सदस्य करूच!”

निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्याने हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकते, अशी ठाम भावना जनतेतून व्यक्त होत आहे. दामू अण्णा कधी अर्ज भरणार, त्यांची रणनीती काय असेल, ते निवडणूक लढवणार की नाही — यापेक्षा सामान्य माणसासाठी महत्त्वाची बाब वेगळी आहे. “वर्षानुवर्षे पाहिलेलं आपलं स्वप्न आपल्यालाच साकार करायचं आहे. आपलं पवित्र मत दामू अण्णा नावाच्या लोकनेत्यालाच द्यायचं आहे,” अशी ठाम भूमिका बेट भागातील जनतेने घेतली आहे.

दामू अण्णा निवडणुकीच्या रणांगणात उतरतीलच; किंबहुना जनतेच्या आग्रहामुळे त्यांना उतरायलाच लागेल, अशी भावना गावागावात व्यक्त होत आहे. शेत-शिवारातील काम मागे पडले तरी चालेल, पण या लोकनेत्याला झेडपी सदस्य करण्यासाठी जिवाचं रान करण्याचा निर्धार रंजल्या-गांजलेल्या, दुबळ्या सामान्य माणसाने केला आहे. आपल्या आणि भावी पिढीच्या शाश्वत विकासासाठी दामू अण्णांसारख्या लोकनेत्याकडे बेट भाग मोठ्या आशेने पाहत आहे.

“अण्णा, ही लोकभावना ओळखा. निवडणूक आता सामान्य माणसाने हातात घेतली आहे. अनेक वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नाला सत्यात उतरायची संधी द्या,” अशी साद जनतेतून उमटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.