टाकळी हाजी | अष्टविनायक महामार्गावरील वाढते अपघात गंभीर चिंतेचा विषय ठरत असून, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ते मलठण दरम्यान महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कवठे येमाई येथील रोडेवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत राजू श्रीराम गाड्री (वय २८, व्यवसाय आईस्क्रिम विक्री, सध्या रा. फुलाई हॉटेल, कवठे येमाई) यांनी फिर्याद दिली आहे. मृत तरुणाचे नाव किरण देवीनाथ जोगी (वय २४, रा. लादवास, ता. मांडल, जि. भिलवाडा, राजस्थान) असे आहे.
सोमवारी (दि.१२) रात्री साडेआठच्या सुमारास किरण जोगी हा दुचाकीवरून पारगावकडे बर्फ आणण्यासाठी जात असताना कवठे येमाई–रोडेवाडी फाटा मार्गावरील काळुबाई नगर परिसरात अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात समोरील वाहनास ओव्हरटेक करताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिताराम काशिनाथ शेटे (वय ५४, रा. संविदणे, ता. शिरूर) यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर जखमी शेटे यांना पारगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या किरण जोगी यांना शिरूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचा तपास शिरूर पोलीस करत असून, महामार्गावरील अपुऱ्या प्रकाशव्यवस्था , वेगमर्यादेचा अभाव आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.