मिडगुलवाडी घाटात बिबट्याचा दुचाकीस्वार तरुणावर हल्ला

0

टाकळी हाजी | सत्यशोध प्रतिनिधी 

मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील कवठे येमाई घाटात बिबट्याने थेट दुचाकीवर झेप घेत तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १०) सायंकाळी घडली. या हल्ल्यात कृष्णा बबन जाधव (वय ३०, रा. मिडगुलवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वन विभागाने दिली.

कृष्णा जाधव हा युवक कवठे येमाई येथून मिडगुलवाडीकडे दुचाकीवरून जात असताना सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घाटातील चढावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झेप घेतली. बिबट्याने त्याच्या मान, गळा व हातावर हल्ला करून गंभीर जखमा केल्या. मात्र, प्रसंगावधान राखत जाधव याने शर्थीचा प्रतिकार करत बिबट्याचा हल्ला परतवून लावत आपला जीव वाचवला.

दरम्यान, पाठीमागून येत असलेल्या सागर मिडगुले या युवकाने रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला जाधव याला पाहून नागरिकांच्या मदतीने तातडीने हालचाल केली व त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिरूर वन विभागाने जखमी तरुणास पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात हलविले.

वनपाल नितीन म्हात्रे, वनरक्षक नारायण राठोड, वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. दरम्यान, परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घाट परिसरात रात्रीच्या वेळी प्रवास टाळण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.