टाकळी हाजीत रणशिंग फुंकलं! दामुशेठ घोडेंचं मेगा शक्तिप्रदर्शन
निवडणुकीची चाहूल, विरोधक गडबडले
शिरूर | (प्रतिनिधी)
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी आयोजित केलेला भव्य जागरण-गोंधळ व महाप्रसाद कार्यक्रम म्हणजे आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा थेट बिगुल ठरला आहे. हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने बेट भागात राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक जणू आत्ताच जाहीर झाली आहे, असा माहोल तयार झाला आहे.
कार्यक्रमातील अफाट गर्दी, काटेकोर नियोजन आणि गावोगावचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता दामुशेठ घोडेंनी निवडणुकीची पहिली बाजी मारली, असे चित्र स्पष्ट दिसत आहे. कार्यक्रम सुरू होताच विरोधकांच्या गोटात गडबड उडाली असून, अनेकांनी आकडेमोड सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. “बत्त्या गुल” ही स्थिती विरोधकांसाठी वास्तव ठरत असल्याचे बोलले जात आहे.
भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे यांनी व्यासपीठावरून दामुशेठ घोडे यांना भाजपमध्ये येण्याचे खुले आमंत्रण देताच राजकीय चर्चांना उधाण आले. डॉ. सुभाष पोकळे यांचा पंचायत समिती सभापती म्हणून उल्लेख हा पुढील सत्तासमीकरणांचा स्पष्ट संकेत मानला जात आहे. याचवेळी अनेक मान्यवरांनी दामुशेठ घोडे यांचा “भावी जिल्हा परिषद सदस्य” असा उल्लेख करताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.
टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील तब्बल २० हून अधिक गावांमध्ये घराघरात जाऊन दिलेली निमंत्रण पत्रिका हीच दामुशेठ घोडेंच्या जमीनीवरील ताकदीची साक्ष ठरली. पारनेर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांतूनही मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाल्याने हा कार्यक्रम संपूर्ण विभागाचा राजकीय केंद्रबिंदू ठरला.
ग्रामस्थांनी हा कार्यक्रम स्वतःच्या घरचा समजून उचलून धरला. प्रभाकर गावडे, बन्सीशेठ घोडे, गोविंद गावडे, विक्रम घोडे व सहकाऱ्यांनी केलेले नियोजन हे निवडणूक व्यवस्थापनाचीच रंगीत तालीम ठरल्याचे बोलले जात आहे.
या शक्तिप्रदर्शनाला माजी आमदार अशोक बापू पवार, देवदत्त निकम, मंगलदास बांदल, राहुल पाचर्णे, शशिभाऊ दसगुडे, अण्णा लंके, मधुकर उचाळे, अरुण गिरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावल्याने राजकीय संकेत आणखी ठळक झाले.
एकूणच, टाकळी हाजीत झालेला हा जागरण-गोंधळ म्हणजे निवडणुकीपूर्वीची जनआघाडी उघड करणारा कार्यक्रम ठरला आहे. दामुशेठ घोडेंनी मैदानात उतरण्यापूर्वीच वातावरण आपल्या बाजूने झुकवले असून, येणाऱ्या निवडणुकीत बेट भागात मोठी उलथापालथ अटळ असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.