रांजणगाव MIDC मध्ये दरोड्याच्या तयारीतील सहा जण अटकेत

रांजणगाव पोलिसांची शिताफीची कारवाई

0

रांजणगाव | रांजणगाव एमआयडीसी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून मोठी कामगिरी बजावली आहे. दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजता डायल ११२ वर एका कॉलरने माहिती दिली की, बंद पडलेल्या कंपनीत गुजरात पासिंग नंबरची गाडी घेऊन काही चोरट्यांनी प्रवेश केला असून ते दांडे व टिकावांनी सुसज्ज आहेत.

ही माहिती मिळताच कर्तव्यावरील पोलीस कॉन्स्टेबल संतोष आडसुळ यांनी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना कळविताच घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तपास पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. पो.उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा.फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.हवा. विलास आंबेकर आणि पो.कॉ. उमेश कुतवळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सिक्युरिटी गार्डकडून माहिती मिळाली की आरोपी त्याला पाहून गाडी घेऊन पळून गेले. पोलिसांनी शोध घेत असताना खंडाळामाथा येथे नगर–पुणे महामार्गावरील एका हॉटेलसमोर गुजरात पासिंगची व्हॅगनर गाडी दिसली. पोलिसांना पाहताच इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र पथकाने शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे पुढीलप्रमाणे : सुरेशभाई प्रभुभाई धामेचा, जितेंद्र दिनेश डाभी , मेहुल सुरेशभाई धामेचा, भरतभाई देवजीभाई सोलंकी, उत्सव जितेंद्रभाई डाभी, भरतभाई जिवराजभाई कोळी (सर्व रा. मोरबी–२, इंदिरानगर, ता. व जि. मोरबी, गुजरात)

चौकशीत आरोपींच्या मोबाईलमध्ये बंद पडलेल्या कंपनीचे फोटो आढळले, तर गाडीची पंचासमक्ष तपासणी केली असता टिकाव, लोखंडी दांडे, टोकदार चाकू, सहा मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा एकूण ₹३,४०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी चौकशीत कबूल केले की एमआयडीसी मधील बंद पडलेल्या कंपनीत स्क्रॅप व मातीमध्ये मौल्यवान धातू मिळत असल्याच्या संशयावरून ते चोरी करण्यासाठी आले होते.

या प्रकरणी दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिरुर यांनी आरोपींना दि. १२ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल ,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.