रांजणगाव गणपती येथे ‘आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर’चे भव्य उद्घाटन
रांजणगाव गणपती | रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आरोग्यजागृतीला नवीन दिशा देणारे ‘आराध्या वेलनेस अँड फिटनेस सेंटर’ (आरोग्य मंदिर शाखा) सुरू करण्यात आले. या केंद्राचे भव्य उद्घाटन रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
उद्घाटनाचे औचित्य जिल्हा परिषद सदस्य व श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. या वेळी त्यांनी केंद्राच्या उपक्रमांची, देण्यात येणाऱ्या सुविधा आणि भावी नियोजनाची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमास वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. अर्जुन सुसे, अश्फाक सय्यद, तसेच स्वाती विकास पवार यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन ज्योती सचिन धारकर आणि मीना राम मुंढे यांनी केले.
केंद्रात योग, फिटनेस प्रशिक्षण, ध्यान, आहार मार्गदर्शन, जीवनशैली सुधारणा आणि मानसिक तंदुरुस्ती यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. दैनंदिन ताणतणावाच्या काळात शारीरिक व मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास महिला-पुरुष, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. उपस्थितांच्या उत्साहामुळे परिसरात आरोग्यजागृतीचे नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.
रांजणगावात सुरू झालेल्या या अत्याधुनिक वेलनेस सेंटरमुळे फिटनेस संस्कृतीला नवी दिशा मिळून नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक आणि आवश्यक बदल होण्यास हातभार लागणार आहे.