टाकळी हाजी (दि. १६): प्रतिनिधी
टाकळी हाजी येथील होनेवाडी येथे सावकार घोडे यांच्या शेतात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दिनांक १५ ) घडली आहे. ही घटना बछड्याची उपासमार झाल्यामुळे घडली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
घोडे यांच्या शेतात वखारी मध्ये कांदे भरण्याचे काम चालू होते,अचानक शेजारच्या मकेतून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्याने शेतकऱ्यांनी तिकडे पाहिले असता मकेच्या शेतात बिबट्याचे बछडे साधारणपणे (आठ ते नऊ महिन्यांचे) तिथे खाली झोपलेले दिसले. त्यामुळे काही काळ कांदे भरणारे शेतकरी घाबरून गेले होते. त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना फोन द्वारे ही माहिती दिली.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी करून त्या बछड्याला उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्यांचा वावर वाढला असून पशुधनाबरोबरच माणसावरही बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना या दोन महिन्यात घडलेल्या आहेत. शेळ्या, मेंढ्या,वासरे यांच्यावर हल्ले सुरूच असून या भागातील कुत्र्यांची संख्या खूपच कमी झाली आहे.
ज्या ठिकाणी बिबट्याचा मृत बछडा सापडला तेथून फक्त काही अंतरावर माळवाडी तील पंढरीनाथ भाकरे यांच्या मेंढीवर त्याच दिवशी (मंगळवारी) बिबट्याने हल्ला केल्याने एका मेंढीचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
हा बछडा अजून शिकारी झाला नसेल त्यामुळेच त्याचा उपासमारीने मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.परंतु या भागात बिबट्याचे हल्ले थांबले नसल्याने पशुधन मात्र धोक्यात असल्याची प्रतिक्रिया माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे, शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भाकरे यांनी दिली .