पल्स पोलिओ मोहिमेसाठी टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागातर्फे रविवारी (दि. १२) संपूर्ण पुणे जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्व तयारी पूर्ण केली असून, मोहिमेसाठी ५५ कर्मचाऱ्यांची पथके सज्ज करण्यात आली आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चार उपकेंद्रांतील एकूण लोकसंख्या २८,१३५ इतकी असून, त्यापैकी ० ते ५ वयोगटातील २,४७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी २१ लसीकरण बूथ उभारण्यात आले असून, प्रत्येक बूथवर आरोग्य सेवक, सेविका तसेच आशा वर्कर यांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावोगावी जनजागृती करण्यात आली आहे. तसेच रविवारी (दि. १२) एखादा लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहिल्यास, मंगळवार (दि. १४) ते गुरुवार (दि. १६) या कालावधीत आरोग्य पथकांकडून घरभेटी घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षक महेश राठोड यांनी केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे व डॉ. मनोज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे पर्यवेक्षक डॉ. भरत सोदक व सुवर्णा थोपटे यांनी सांगितले. समुदाय आरोग्य अधिकारी दिपीका काचोळे यांनी मोहिमेची पथक तयारी पूर्ण केली.