पोलिस बंदोबस्ता शिवाय पिंपरखेडमध्ये शेतरस्ता खुला

0

टाकळी हाजी | प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड (बोंबे वस्ती) येथे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्ता अखेर २६ सप्टेंबर रोजी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशानुसार खुला करण्यात आला. सुरुवातीला विरोध व तणाव निर्माण झाला असला तरी महसूल प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे व शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या मध्यस्थीमुळे पोलिस बंदोबस्ताशिवाय दोन महत्त्वाचे रस्ते खुले झाले.

या कार्यवाहीत मंडलाधिकारी राजेंद्र पोटकुले, ग्राम महसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, कोतवाल सारिका वरे यांच्यासह मोठा अधिकारी वर्ग उपस्थित होता. तर शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, समन्वयक व कायदेशीर सल्लागार ॲड. सुप्रिया साकोरे, पत्रकार समन्वयक रवींद्र खुडे, ॲड. सागर जोरी, ॲड. योगेश बारहाते, पिंपरखेडचे पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, चांडोहचे पोलिस पाटील सुदर्शन भाकरे, तसेच कार्यकर्ते सुरेश वाळके, विजय शेलार, शांताराम पानमंद, दत्तात्रय बांगर, प्रकाश वाखारे, सुरेश भुजबळ, अनिल गायकवाड, बाळासाहेब भोस, सोमनाथ गिरमकर, नंदा कदम, भांबर्डेचे पवार आदींनी सहभाग घेतला.

वादी शेतकरी रामहरी बोंबे, सुरेश बोंबे, बाळासाहेब बोंबे, वसंत बोंबे, तसेच प्रतिवादी ढोमे, बोंबे, पाबळे, लामखडे यांच्यासह परिसरातील शंभराहून अधिक शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला रस्ता खुला करण्यास विरोध झाला. मात्र शासन, महसूल यंत्रणा व चळवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे अखेर तोडगा निघाला.
विशेष म्हणजे, रस्ता खुला करताना प्रतिवादी शेतकऱ्याच्या उभ्या मका पिकाचे जेसीबीने नुकसान होऊ नये म्हणून शरद पवळे यांच्यासह शेत रस्ते चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः हाताने दोन सऱ्या उपटून दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष शमत गेला आणि कार्यवाही सुरळीत पार पडली.

रस्ता खुला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व शेतातच सर्व उपस्थितांना मासवडीचे जेवण देऊन समाधान साजरे केले. या जेवणाच्या छायाचित्रांना व व्हिडिओंना सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत असून, शेतकऱ्यांचा आनंद सर्वदूर पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.