पंचतळे -भागडी शिवरस्ता अखेर पोलिस बंदोबस्तात खुला
पोलिस बंदोबस्तात दोन्ही तालुक्यांना जोडणारा अडवलेला शिवरस्ता अखेर दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने केला खुला
सविंदणे दि. ११ ( वार्ताहर )
पन्नास वर्षापासून शिरूर तालुक्यातून जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी पंचतळे -भागडी हा चालू वहीवाटीचा शिव रस्ता एका शेतकऱ्याने दिडमहीन्यापुर्वी अडवला होता. सदरचा रस्ता अडवल्यामुळे नागरीकांची दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली होती. तो रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे व सहकाऱ्यांनी जुन्नर व शिरूर तहसिल कार्यालयाकडे हा रस्ता खुला करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.
शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व त्यांच्या पथकाने तसेच टाकळी हाजी मंडल अधिकारी एकनाथ ढाके , पिंपरखेड तलाठी अमोल थिगळे , जुन्नरच्या निमगाव सावाचे मंडल आधिकारी नितीन चौरे, पिंपरी कावळच्या तलाठी स्वाती जाधव यांच्या टिमने अतिक्रमण बाजूला करत तात्काळ नागरीकांसाठी रस्ता खुला केला आहे.
हा रस्ता खुला केल्यामुळे शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने शिरूरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी, शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक सुनिल ऊगले यांचा नागरी सन्मान करण्यात आला आहे.