शिरूर पोलिसांची धडक कारवाई : सराईत गुन्हेगार विकास उर्फ काज्या चोरे स्थानबद्ध
शिरुर : प्रतिनिधी
शिरूर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकास उर्फ काज्या बाबाजी चोरे (वय २५, रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे) यास एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे.
चोरे याच्यावर वारंवार प्राणघातक हल्ले करून जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, गावठी पिस्तुले जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, तसेच अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ ते २०२५ या काळात त्याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात एकूण पाच गुन्हे नोंदवले गेले आहेत.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) आदेश दिला. त्यानुसार शिरूर पोलिसांनी विकास चोरे याला ताब्यात घेऊन शनिवारी (दि. २० सप्टेंबर) मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे रवाना केले.
गेल्या दोन वर्षांत शिरूर पोलिस ठाण्याने पाच सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करून तालुक्यातील गुन्हेगारीवर कडक आळा घातला आहे. पुढेही एम.पी.डी.ए., मोक्का तसेच भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये कठोर कारवाई केली जाणार असून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला.
या कारवाईत पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार महेश बनकर, हवालदार मंगेश थिगळे, परशराम सांगळे तसेच पोलिस कर्मचारी सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, अंबादास थोरे व निरज पिसाळ यांनी विशेष योगदान दिले.