प्रा. डॉ. विकास नायकवडी यांना ‘कृषिरत्न’ पुरस्कार
नायकवडी हे सी टी बोरा महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक
शिरूर : (साहेबराव लोखंडे )
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा. (कॅप्टन) डॉ. विकास बंडू नायकवडी यांना पश्चिम घाटातील कृषी क्षेत्रातील जैवविविधतेवरील मूलभूत संशोधनासाठी ‘कृषिरत्न पुरस्कार’ देण्यात आला.
बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक दिन सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या हस्ते श्रीयश फाउंडेशन पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. नायकवडी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वनस्पती जैवतंत्रज्ञानात पीएचडी प्राप्त केली असून ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. पश्चिम घाटातील औषधी वनस्पती, विविध कवक तसेच जमिनीतील रायझोबियम जिवाणू यांच्या जैवविविधतेवर त्यांचे संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर स्थानिक वनस्पती व त्यांच्या औषधी गुणधर्मांचा डेटाबेस तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही ते करत आहेत.
त्यांचे अनेक संशोधनलेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून विविध कार्यशाळांत सहभागामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा मिळत असून वनस्पतीशास्त्र क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.
स्थानिक तसेच शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात प्रा. डॉ. नायकवडी यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.