ॲड. वसुमती गावडे यांचे निधन
टाकळी हाजी |
पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या पत्नी व कायदेतज्ञ वसुमती प्रभाकर गावडे (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने बुधवार (दि. २७) रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने टाकळी हाजी गावासह शिरूर तालुक्याच्या बेट भागात हळहळ व्यक्त होत आहे.
वसुमती गावडे या अभ्यासू वकील म्हणून प्रसिद्ध होत्या. कायद्याबरोबरच कृषी, साहित्य, विज्ञान, सहकार, कला, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये त्यांना विशेष रस होता. हिंदू शेगर धनगर समाजाच्या त्या वरिष्ठ पदाधिकारी होत्या. पुण्यात वास्तव्यास असूनही त्यांचे गावाशी घट्ट नाते होते. शेतीची आवड जोपासण्यासाठी त्यांनी टाकळी हाजी येथे नुकतेच नवीन घर बांधले होते.
अलीकडेच त्यांचा धाकटा मुलगा वेदांत याचा विवाहसोहळा २५ ऑगस्ट रोजी पार पडला. या लग्नाच्या तयारीसाठी त्या पंधरा दिवसांपूर्वी गावाकडे आल्या होत्या. मात्र, लग्नाच्या पाच दिवस आधी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात हलवण्यात आले होते. विवाहसोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला; मात्र वसुमतीताईंची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती.
त्यांच्या निधनाने पती प्रभाकर गावडे यांची मोठी साथ हरपली आहे. वकिली व्यवसायासोबतच समाजसेवेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. पुण्यात कामानिमित्त गेलेल्या टाकळी हाजी व शिरूर परिसरातील नागरिकांना कायदेशीर मदत करून त्या नेहमीच लोकांच्या पाठिशी उभ्या राहत.
त्यांचा मोठा मुलगा अजिंक्य हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर असून पत्नीसमवेत कार्यरत आहे. धाकटा मुलगा वेदांत याने एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले असून शेती सांभाळत आहे. मुलगी प्रेरणा हिने सुद्धा एलएलबी शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
वसुमती गावडे या टाकळी हाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या विद्यमान संचालिका होत्या. अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे सोसायटीमध्ये त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे..शिरूरच्या बेट भागाने एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.