कवठे येमाई येथे उसाच्या शेतात सापडला मृतदेह : खुनाचा संशय
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गणेशनगर – गांजेवाडी परिसरात बुधवारी (दि.२०) सकाळी उसाच्या शेतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेके मंगळवारी (दि.१९) सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडले होते. नातेवाईकांच्या मते सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता; मात्र त्यानंतर फोन बंद झाला. दिवसभर ते घरी परतले नाहीत किंवा संपर्कही झाला नाही. त्यामुळे मुलांनी व नातेवाईकांनी शोध सुरू केला.
दरम्यान, फाकटे येथील एका युवकाने मंगळवारी टेके यांना गणेश नगर–गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी नातेवाईकांनी त्या रस्त्याने जात शोध घेतला असता कवठे येमाई येथील गांजेवाडी रोडवरील पोल्ट्री शेजारी त्यांची दुचाकी सापडली. त्यानंतर दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ऊसाच्या शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना समजताच टाकळी हाजी दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार गणेश आगलावे, संतोष बनसोडे हे तिथे पोहोचले.
मृतदेहाच्या डोक्याला व मानेजवळ गंभीर जखमा असून प्राथमिक पाहणीत खूनाचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.