शेतकऱ्यांच्या पशुधनावर चोरट्यांचा डोळा
टाकळी हाजी |( साहेबराव लोखंडे)
शिरूर तालुक्यातील माळवाडी येथून मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) रात्री चोरट्यांनी दोन शेळ्यांची चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी अविनाश लक्ष्मण भाकरे (वय ३५, रा. माळवाडी, टाकळी हाजी) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
भाकरे यांच्या शेळ्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या असताना, चोरट्यांनी दोन शेळ्या चोरून नेल्या. चोरून नेलेल्या शेळ्यांची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शिवाजी बनकर तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी निमगाव दुडे आणि टाकळी हाजी परिसरातून म्हैस चोरीची प्रकरणे घडली होती. त्या घटनांचा तपास अद्याप अपूर्ण असतानाच पुन्हा एकदा पशुधन चोरीची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
एकीकडे बिबट्याचे हल्ले आणि दुसरीकडे चोरट्यांची वाढती धाडसी कृत्ये पाहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाचे रक्षण करणे मोठे आव्हान ठरत आहे. पोलिसांनी या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ तपास पूर्ण करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या चोरीच्या घटनांचा कसून तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल.
दिलीप पवार,पोलिस उपनिरीक्षक शिरूर