निघोजमध्ये रस्ता रोकोला अभूतपूर्व प्रतिसाद

शेतकरी व वारकरी संप्रदाय एकत्र आंदोलनात उतरले

0

निघोज | प्रतिनिधी

निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी शेतकरी उपोषणाल बुधवार, ३० जुलै २०२५ रोजी अभूतपूर्व समर्थन लाभले, कारण शेतकरी आणि वारकरी संप्रदायाने एकत्र येऊन भव्य रस्ता रोको आंदोलन यशस्वीरीत्या पार पाडले.सकाळी गावातून वारकरी मंडळी आणि शेतकरी यांनी गावातून फेरी काढली.. “जय जवान जय किसान”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

नंतर निघोज बस स्थानक परिसरात शेकडो शेतकरी, महिला, युवा कार्यकर्ते आणि वारकरी बंधु-भगिनींनी रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. त्यांना पाठिंबा देण्यासाठी परिसरातील विविध गावांमधून मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली.

रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर आणि अन्य नेत्यांनी संबोधन करत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यांनी पुन्हा एकदा मागण्या मांडत, “शासनाने वेळकाढूपणा थांबवून त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा दिला.

प्रमुख मागण्या पुन्हा अधोरेखित करण्यात आल्या:
कांद्याला ₹३५-₹४० हमीभाव
कर्जमाफी अंमलात आणणे
नाफेडमार्फत कांदा खरेदी
दूध व शेतीमालास योग्य दर
निर्यात धोरण राबवणे

पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून, आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले. स्थानिक प्रशासनासह विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे आणि वारकरी संप्रदायाच्या प्रमुख मंडळींनी संयम आणि एकतेचे उदाहरण निर्माण केले.

 

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन राज्यभर भडकवले जाईल.
निघोज आता शेतकरी लढ्याचे केंद्रबिंदू बनले असून, या एकतेच्या निर्धाराने शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद होतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.