निघोजमध्ये शेतकरी व वारकरी संप्रदायाचा निर्णायक निर्धार

बुधवारी भव्य रस्ता रोको आंदोलन

0

निघोज | प्रतिनिधी

निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे २८ जुलै २०२५ पासून सुरू असलेल्या राज्यव्यापी शेतकरी उपोषणाला आता अधिक तीव्र स्वरूप येत असून, बुधवार, ३० जुलै रोजी सकाळी १० वाजता निघोज बसस्थानक परिसरात भव्य रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आंदोलनाला वारकरी संप्रदायाकडून उघड पाठिंबा जाहीर करण्यात आला असून, परिसरातील सर्व वारकरी मंडळी आणि शेतकरी बांधव एकत्र येऊन सरकारच्या विरोधात शांततामय पण ठाम निषेध व्यक्त करणार आहेत.

सकाळी ८ वाजता निघोज गावातून वारकरी संप्रदायाच्या दिंडीची फेरी काढण्यात येणार आहे. भजन, कीर्तन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी व वारकरी एकत्रपणे रस्त्यावर उतरणार आहेत.

आंदोलनाचे नेतृत्व रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर आणि इतर शेतकरी नेते करत असून, सरकारने अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आता रस्ता रोको हा शांततेचा पण परिणामकारक मार्ग अवलंबला जात आहे.

प्रमुख मागण्या:
कांद्याला किमान ₹३५-४० दर मिळावा
जाहीर कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी
हमीभाव आणि निर्यात धोरणाची स्पष्टता
नाफेडमार्फत खरेदी सुरू करणे

“जय जवान जय किसान” या घोषणांनी परिसर दणाणून जाण्याची शक्यता असून, शेतकरी व वारकरी बांधवांना या ऐतिहासिक लढ्याला पाठिंबा देण्यासाठी समस्त शेतकरी संघटनांकडून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.