निघोज | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे आज सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता भव्य राज्यव्यापी उपोषणाला जोरदार सुरुवात झाली. निघोज बसस्थानक परिसरात सुरू झालेल्या या उपोषणाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“जय जवान, जय किसान” आणि “आपली माती, आपली माणसं” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नेतृत्व करणारे रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर आणि इतर शेतकरी कार्यकर्ते यांनी सरकारकडून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आता निर्णायक लढा उभारण्याची घोषणा केली.
उपोषणाच्या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. तसेच विविध गावाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट दिली. शेतकरी प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करत पाठिंबा दर्शविला तसेच शांततेने आंदोलनात सहभाग घेतला.
प्रमुख मागण्या:
कांद्याला ₹३५-४० प्रति किलो दर
जाहीर केलेली कर्जमाफी तातडीने लागू करणे
शेतीमालाच्या निर्यातीसाठी स्पष्ट धोरण
नाफेडमार्फत कांद्याची खरेदी
दूध व इतर शेतीमालास हमीभाव
ढवण यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. आम्ही आमचे हक्क मागत आहोत.” उपोषण शांततामय पद्धतीने सुरू असून, शेतकऱ्यांनी ‘संघटितपणा आणि संयम’ या दोन्ही बाबींचा आदर्श ठेवत आपली भूमिका मांडली आहे. आंदोलनात सहभागी अनेक महिला शेतकरीही आपला आवाज बुलंद करत आहेत.
सरकारकडून लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे. उद्याच्या दिवसात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासन व माध्यमांचेही लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले आहे.