प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची शक्यता
टाकळी हाजी मंडल अधिकारी यांच्या चौकशीसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा पर्याय
टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे)
टाकळी हाजी ( ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या विरोधातील नागरिकांचा रोष आता कृतीत उतरत आहे. मंडल अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांच्या संतापाची परिणती तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासन वेळेत दखल घेत नसल्यामुळे नागरिकांचा संयमाचा बांध फुटला असून, “आता आरपार!” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
आंदोलनात महिलांचा सहभाग असणार आहे. “लाचखोर हटाव!”, “मनमानी थांबवा!”, “लाचखोरीला आळा घाला!” अशा प्रकारे आवाज उठवला जाणार असून वडनेर, फाकटे, काठापूर, पिंपरखेड, म्हसे, डोंगरगण, टाकळी हाजी , आमदाबाद आदी गावांतील शेतकरी, महिला, तरुण, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
“सरकारी कार्यालयात आमचं काम झालं नाही तर कुठे जायचं? यंत्रणा दडपशाही करत असेल तर लोकशाहीचाच गळा घोटला जातोय,” अशी तीव्र प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकांनी दिली. महिलांनीही पोटकुले यांच्या उद्धट वागण्याचा निषेध करत “आम्ही अबला नाही, आता जागी झालोय!” असा निर्धार बोलून दाखवला.
आंदोलनाबाबत पोलिस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून चौकशीची कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “एक आठवड्यात कारवाई झाली नाही, तर पुढचा टप्पा आंदोलनाचा असेल.” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. “लोकशाहीत आवाज दडपता येत नाही. आता लोकशक्तीचं आंदोलन पेटणार आहे,” असे सांगत सामाजिक संघटना एकवटण्याच्या तयारीत आहेत.