टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे)
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असून, संपूर्ण बेट विभागातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना पसरली आहे. स्थानिक शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे.
‘ सत्यशोध न्यूज’ ने या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊन बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पिंपरखेड, वडनेर, म्हसे, डोंगरगण, आमदाबाद, फाकटे, माळवाडी, शरदवाडी, काठापूर आदी गावांमधून अधिकाऱ्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.
‘कंटाळवाणी सेवा, उद्धट वर्तन’ – नागरिकांचे आरोप
नागरिकांच्या मते, मंडल अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ते बहुतेक वेळा फोन उचलत नाहीत आणि उचलल्यास उद्धटपणे संवाद साधतात. “माझ्याकडे एवढंच काम आहे का?” असा उपरोधिक प्रश्न विचारून नागरिकांचा अपमान केला जातो, असे अनेकांनी सांगितले.
‘ऑनलाईन ‘ लाच घेतल्याचा गंभीर आरोप
दोन मिनिटांत होणारी कामे आठवड्यन्आठवडे प्रलंबित ठेवली जात असल्याची तक्रार वारंवार झाली आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे काही नागरिकांनी असा दावा केला आहे की, अधिकारी थेट ‘ऑनलाईन लाचेची रक्कम स्वीकारतात. या संदर्भातील व्यवहारांची यादी तयार केली जात असून, ती लवकरच जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.
‘वरदहस्त कोणाचा?’ – नागरिकांमध्ये चर्चा
“या अधिकाऱ्याला कोणाचा वरदहस्त आहे का?” असा प्रश्न संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. या अधिकाऱ्याच्या गैरकारभारामुळे संपूर्ण बेट विभागातील निमगाव दुडे, म्हसे, माळवाडी, वडनेर, फाकटे, चांडोह, जांबुत, काठापूर आणि पिंपरखेड आदी गावांतील कामे खोळंबली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
चौकशी व बदलीची मागणी, अन्यथा आंदोलन
या अधिकाऱ्याची तात्काळ चौकशी करावी आणि बदली करून जबाबदार, कार्यक्षम आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर याची गंभीर दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सामाजिक संघटनांनी दिला आहे.
प्रशासनाने या गंभीर तक्रारींची चौकशी करून पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा उभारावी, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.