टाकळी हाजी प्रतिनिधी
कलाकारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक,ज्येष्ठ ढोलकी पटू,लोकगीतकार,लेखक व कवी म्हणून नावाजलेले ढोलकीचा बादशहा गंगाराम बुवा कवठेकर-रेणके यांचे यांचे गुरुवारी( दि. ०३) पहाटे निधन झाले.
मृत्यूसमयी ते ९६ वर्षांचे होते.महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च अशा जीवनगौरव पुरस्काराने गंगारामबुवांना सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या निधनाने समस्त रेणके परिवारा बरोबर कवठे येमाई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल (सनी) रेणके यांचे ते आजोबा होत.
वयाच्या तेराव्या वर्षापासून कलाक्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देत १९३८ च्या दशकामध्ये गंगाराम बुवा कवठेकर तमाशा मंडळाची पायाभरणी करून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असे ढोलकी पटू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. विनोद वीर म्हणूनही त्यांची ख्याती होती. २०१४-१५ चा विठाबाई भाऊ मांग या महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च अशा जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कारामध्ये मिळालेल्या काही रकमेतून त्यांनी समाजकार्यासाठी हातभार लावला आहे.
त्यांच्या निधनाबद्दल शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे, अरूणाताई घोडे राज्यस्तरीय तमाशा महोत्सवाचे अध्यक्ष वसंतराव जगताप,कवठे येमाई चे सरपंच सुनीताताई पोकळे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम जाधव, टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे , कलाकार राजू पोपळघट,सचिन शिंदे व ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला.